Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांची आज तिसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी गुरुवारी 1 तारखेला ईडी चौकशीला ते हजर राहिले होते. तर २४ जानेवारी रोजी याच प्रकरणात त्यांची तब्बल ११ तास चौकशी झाली होती. एका कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांची मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे.
आता आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रोहित पवार ईडीच्या चौकशीला समोर जाणार आहे. आज रोहित पवार यांच्याकडून काही कागदपत्र ईडीकडे सादर केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेल्यावर रोहित पवार पहिल्यांदा चौकशीला सामोर जाणार आहेत. ईडीने 24 जानेवारी रोजी बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीशी संबंधित रोहित पवार यांची चौकशी केली होती.
प्रकरण काय?
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने या कारखान्याची खरेदी केली होती. . या लिलावात फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बारामती अॅग्रोने 50 कोटी रुपयांत कन्नड सहकारी साखर कारखान्याची बँक लिलावातून खरेदी केली होती. पण या लिलावात सहभागी असलेल्या कंपनी बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कार्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप केला. त्यावरून ईडीकडून रोहित पवार यांची चौकशी केली जात आहे.