तारळेचा फलाट शोधताना प्रवाशांची दमछाक

कराड बसस्थानकातील प्रकार; फलटावरून तारळे गावाच्या नावाची पाटीच गायब
दिलावर आतार
तारळे – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुखरूप प्रवासासाठी बरेच प्रवासी खाजगी बस, वडापपेक्षा एसटीनेच प्रवास करणे पसंत करतात. कराड बसस्थानकाचे सुध्दा सुंदर बांधकाम करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक फलाटावर सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांना बसण्याची स्वतंत्र बैठक व्यवस्था, प्रत्येक गावाच्या नावाचे फलक फलाटावर लावण्यात आलेले आहेत. मात्र कराडच्या सुंदर बसस्थानकात लावण्यात आलेल्या एकूण 20 फलाटावरील फलकावर तारळे या गावाचे नाव कोठेही नसल्यामुळे तारळेची बस शोधताना तारळेकरांसह या मार्गावरील प्रवाशांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे.

कराडच्या जुन्या बसस्थानकात तारळे गावाचा उल्लेख असलेला फलक फलाटावर होता. यामुळे तारळे व यामार्गावरील गावचे प्रवाशी संबंधित फलाटावर एसटीची वाट बघत बसायचे. मात्र बसस्थानकाच्या नूतनीकरणानंतर बनविण्यात आलेले फलाट यावर पूर्वीच्या फलकाची जागा नवीन फलकांनी घेतली असली तरी काही फलकांवर महत्त्वाची गावेच गायब झाली असल्यामुळे प्रवाशांना बस शोधण्यासाठी या फलाट वरून त्या फलाटवर पळापळ करावी लागत आहे. आणि पळापळ करून सुध्दा बस चुकली तर मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

तारळेसह संपूर्ण भागातील विद्यार्थी दहावी बारावीनंतरचे शिक्षण घेण्याकरीता कराडला येत असतात. तसेच ग्रामस्थ सुध्दा दवाखान्यातील औषधोपचारासाठी, लग्न कार्यासाठी, नातेवाईकांकडे कामानिमीत्ताने अशा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कराड बसस्थानकात येत असतात.

यावेळी सर्वच जण एसटीच्या सुरक्षित प्रवासासाठी बसस्थानकात येतात. काशिळ, शिरगाव, आदर्शनगर, पाली, निवडे, राहूडे, तारळे, कडवे, जळव, मुरुड या गावातील प्रवाशांना फलाटवरील फलकावर गावाचे नाव नसल्याने अतिशय अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फलाटवरील फलकावर गावाचे नाव असले की आपल्या गावाकडच्या बस शोधण्यास अत्यंत सोयीचे होते. म्हणून आगारप्रमुखांनी कराड आगारातील बसेस ज्या गावांना सुरु आहेत. त्या गावांच्या नावांचे फलक फलाटावर लावावेत. अशीही मागणी तारळेसह भागातील प्रवाशी वर्गामधून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.