जिल्ह्यात 396 कृषिपंपांना वीजजोडणी

उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे कामे
राज्यातील 5,894 शेतकऱ्यांना वीजपुरवठा

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना शाश्‍वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने जाहिर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणालीचे कामे आता प्रगतीपथावर असून राज्यात आतापर्यंत सुमारे 5 हजार 894 शेतकऱ्यांना तर सातारा जिल्ह्यातील 396 कृषीपंपांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या अभिनव संकल्पनेला ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या योजनेच्या माध्यमातून गती दिली. त्यानुसार मार्च 2018 अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी सरासरी 2 लाख 50 हजार रूपयांचा अंदाजित खर्च येणार असून 2.50 लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या 33 हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे 11,189 कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात येणार असून आतापर्यंत 396 कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे. उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्याकरिता राज्यात 5 हजार 48 कोटींचा खर्च होणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने 10 व 16 केव्हीएचे सुमारे 1 लाख 30 हजार इतक्‍या मोठ्या प्रमाणात रोहित्र लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान व साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत थोडा विलंब झालेला आहे.

राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. या प्रणालीचे कामे जलद व उच्चदर्जाची व्हावीत यासाठी महावितरणने देशभरातील नामांकित कंपन्यांना आवाहन केले असून व्होल्टाससहित नामांकित कंपन्यांनी प्रणालीच्या निविदांना मोठा प्रतिसाद दिला आहे. ही योजना फूल-ट्रंकी व पार्शियल-ट्रंकी अशा दोन प्रकारे राबविण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये महावितरण रोहित्रे देणार असून उर्वरित कामे एजन्सींना करावयाची आहेत. यामध्ये 600 एजन्सींना कामे मिळाली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रोहित्रांसह 100 टक्के कामे एजन्सीना देण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-2020 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here