सीपीआय, बसपा, राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाण्याची चिन्हे

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर सीपीआयचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेतला जाण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीत सीपीआयला फक्त दोन जागा मिळवता आल्या आहेत. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याचे संकट आहे. या तिन्ही पक्षांनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी केली आहे.

या पक्षांना 2014च्या निवडणुकीत खराब कामगिरीनंतरही दिलासा मिळाला होता. कारण, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या निर्णयाची समीक्षा 5 ऐवजी प्रत्येक 10 वर्षांनी करणार असल्याचा नियम निवडणूक आयोगाने केला होता. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

सीपीआय नेत्याच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सध्याच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेतला जाण्याचे संकट आहे. आमचे अस्तित्व राष्ट्रीय स्तरावर नाही याचा निर्णय आयोगाकडून घेतला जाईल. आम्हाला अपेक्षा आहे, की आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दरम्यान, हा दर्जा काढल्यानंतरही पक्षाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही या नेत्याने सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.