सातारा – सातारा जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांची ज्युनिअर एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून भारतीय खेळ प्राधिकरणाच्यावतीने निवड झाली आहे. सागर जगताप यांच्यामुळे नवीन आंतरराष्ट्रीय बॉक्सर्स देशाला मिळतील, असा विश्वास व्यक्त करतानाच जगताप यांच्यामुळे साताऱ्याचे नाव देशाबाहेर झळकेल, असे गौरवोद्गार जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी काढले.
कझाकीस्तान येथे होणाऱ्या एशियन ज्युनिअर बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सागर जगताप यांची भारतीय खेळ प्राधिकरण यांच्यावतीने निवड करण्यात आली आहे. तसेच सातारा बॉक्सिंग ऍकॅडमीचा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू सैफअली साजिद झारी याची या स्पर्धेसाठीच्या भारतीय सराव संघात खेळाडू म्हणून निवड झाली आहे. याबद्दल या दोघांचाही नितीन तारळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे राज्य तांत्रिक अधिकारी रविंद्र होले, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे स्टार टू पंचाधिकारी अमर मोकाशी, सातारा बॉक्सिंग ऍकॅडमीचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप, बापूसाहेब पोतेकर, संतोष कदम आदींची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.
या यशाबद्दल सागर जगताप आणि सैफअली झारी याचे सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कार्याध्यक्ष रवींद्र झुटिंग, योगेश मुंदडा, क्लबचे पदाधिकारी हरीश शेट्टी, मंगेश जाधव, देवेंद्र बारटक्के, सातारा बॉक्सिंग ऍकॅडमीचे सर्व पदाधिकारी, खेळाडू, पालक यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.