जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड ते काठापूर खुर्द या प्रमुख जिल्हामार्ग असलेल्या डांबरी रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रात्रीच्या वेळी झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
या धोकादायक खड्ड्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या खड्ड्यांची दुरुस्ती न केल्याने अपघात घडला आहे. पिंपरखेड ते काठापुर खुर्द आणि पुढे आंबेगावच्या हद्दीपर्यंत असलेल्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून रस्त्याच्या काही ठिकाणी धोकादायक खड्डे पाहायला मिळत आहेत.
मंगळवारी रात्री आठ वाजता दुचाकीवरून चाललेल्या दुचाकीस्वाराला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त व्यक्तीला तत्काळ पारगाव शिंगवे येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या खड्ड्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणे अपेक्षित आहे.
रस्त्यावर काही ठिकाणी धोकादायक पडलेले खड्डे आहेत. डांबरी रस्त्याची साइडपट्टी खचल्याने अरूंद डांबरी रस्त्यावर प्रवास करताना अपघात घडत आहेत. संबंधित विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी.
-राजेंद्र दाते, उपसरपंच काठापूर खुर्द