इंदूर – इंधन दरवाढीच्या भडक्याने देशातील जनता होरपळून निघत असतानाच मध्यप्रदेशातील भाजप मंत्र्याने अजब-गजब भूमिका मांडली. कमाई वाढल्याने जनतेने थोडीफार महागाईही स्वीकारावी. सरकार सर्व काही मोफत देऊ शकत नाही, असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता.
मध्यप्रदेशचे पंचायत आणि ग्रामविकास मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया यांची येथे पत्रकार परिषद झाली. पेट्रोल, डीझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून राज्य सरकार जनतेला दिलासा का देत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते उत्तरले, 10 वर्षांपूर्वी दरमहा 6 हजार रूपये पगार असणाऱ्यांना आता 50 हजार रूपये मिळत आहेत. त्यामुळे आताही पेट्रोल, डीझेलचे दर 10 वर्षांपूर्वी इतकेच ठेवण्याची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. समाजातील सर्वच घटकांचे उत्पन्न मागील काही वर्षांत वाढले आहे. आधी कुटूंबात एकच दुचाकी असायची.
आता कुटूंबातील प्रत्येक सदस्याकडे वाहन असते. त्यामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील कॉंग्रेस सरकारांच्या काळात देशात महागाई वाढत नव्हती का, असा प्रतिसवालही त्यांनी केला. सरकारला कर आकारणीतून महसूल मिळतो. तो कल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठीच खर्च केला जातो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.