नाणे मावळ (वार्ताहर) – उन्हाळ्यात सायकलवर मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात फिरून गारीगारची (आईस्क्रीम) विक्री करणारे अनेकजण आढळून येतात. ही गारीगार जणू अनेकांसाठी अमृतच. दुधाच्या दरासह कच्च्या मालाच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पण वाढत्या महागाईची झळ आता कुल्फी आणि गारीगारलाही बसली आहे.
मावळ तालुक्यातील गावागावांत होणाऱ्या जत्रेत गारीगारला मोठी मागणी असते. मात्र दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी वाढते ऊन पाहता विक्रीत २० टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात गारीगार व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. यंदा महागाईच्या तडाख्याने गारीगार वितळू लागले आहे. दुधासह इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वच फ्लेवरच्या किमतीत वाढ झालेली आहे. त्यामुळे गारीगार खवय्यांना अधिकचा खिसा हलका करावा लागणार आहे. पार्टी असो किंवा छोटासा घरगुती कार्यक्रम, आईस्क्रीम नसेल तर त्यात रंगत येत नाही.
तालुक्यातील काही मोठ्या गावांमध्ये मिळणाऱ्या फॅमिली पॅकची किंमत १९० रुपयांवरून २२० रुपयांवर गेलेली आहे. उष्णतेत वाढ झाल्याने आईस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांची गर्दीसुद्धा वाढू लागली आहे. सर्वच चवीच्या आईस्क्रीमची श्रेणी बाजारात उपलब्ध आहे. प्रत्येक वयोगटातील ग्राहकांना आकर्षित करत आहे.
सध्या अनेक नवीन फ्लेवर्स बाजारात आले आहेत, पण केशर पिस्ता आणि बटर स्कॉच आणि सोबतीला कुल्फी सदाबहार आहेत. त्यापाठोपाठ ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, राजभोग, रजवाडी या फ्लेवर्सलाही पसंती असते. मात्र दूध आणि इतर गोष्टी महागल्याने आइस्क्रीमच्या किमतीत दरवाढ झाली आहे.
फ्रोझन डेझर्ट आणि पिवर मिल्सच्या साहाय्याने तयार केलेले आईस्क्रीम बाजारात आहेत. ग्राहकांमध्ये जनजागृती वाढू लागल्याने पिवर मिल्स आईस्क्रीमला मागणी वाढलेली आहे. कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने यंदा १५ ते २० टक्के गोरीगार आणि आईस्क्रीमच्या दरात वाढ झालेली आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
बाजारातील सर्व प्रसिद्ध बॅण्डमध्ये अमूल, क्वालिटी, अरुण, मदर डेअरी आदींसह स्थानिक कंपन्यांचे आईस्क्रीमही बाजारात आहेत. आइस्क्रीम कप, कोन, स्टीक आणि फॅमिली पॅकमध्ये वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहे. ग्राहक याची निवड आपल्या चवीनुसार करतात.
सर्व प्रकारच्या चवीची आइस्क्रीम सर्वांना सहजरित्या उपलब्ध व्हावे, यासाठी सर्व बॅण्डने याचे छोटे पॅकही आणले आहे. आइस्क्रीम एक कपची सुरवात १० किंवा २५ रुपयांपासून सुरू होते. त्यात कोन, स्टीक आणि फॅमिली पॅकही छोट्या आकारात उपलब्ध आहे.