मुंबई – मुंबईत 1968 साली अवतरलेल्या रामन राघव नावाच्या सिरियल किलरची आठवण यावी असा प्रकार मुंबईत घडला असून फुटपाथवर झोपलेल्या दोन इसमांना कोणतेही कारण नसताना दगडाने ठेचून ठार मारणाऱ्या इसमास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सुरेश शंकर गौडा असे त्याचे नाव असून त्याने 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी या दोन जणांच्या हत्या केल्या आहेत. मुंबईतील फुटपाथवरील जे मृत्यू अजून उघडकीला आलेले नाहीत त्या अनुषंगानेही पोलिसांनी आता त्याच्याकडे तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी जेव्हा गौडाला जेरबंद केले त्यावेळी त्याने कोणताही पश्चाताप व्यक्त केला नाही, किंवा कोणत्याही भावना त्याने व्यक्त केल्या नाहीत. तो शांतपणे पोलिसांच्या स्वाधिन झाला. गौडा हा मुळचा कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील रहिवासी आहे.
तो मुंबईत भंगार गोळा करून उपजिविका करीत असे. त्याच्या हत्यांच्या संबंधात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून त्या आधारे पोलिसांनी त्याला जेरबंद केले. 23 ऑक्टोबर रोजी पहिली हत्या त्याने भायखळा फळ बाजारातील फुटपाथवर झोपलेल्या इसमाचा 7 वाजून 50 मिनीटांनी खून केला. त्याने फुटपाथसाठी वापरण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने त्या झोपलेले इसमाचे डोके ठेचून त्याला ठार मारले.
तेथूनच एक किमी अंतरावरील जेजे हॉस्पिटलच्या गेट नंबर 14 च्या फुटपाथवर झोपलेल्या इसमालाही त्याने 8 वाजून 5 मिनीटांनी दगडाने ठेचून मारले. त्याने हे दोन्ही प्रकार ज्या ठिकाणी केले ती दोन्ही ठिकाणे वर्दळीची आहेत. पण त्याच्या कृत्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. किंवा त्याला कोणीही अडवले नाही.
रात्री नऊच्या सुमाराला तो जेजे रूग्णालयाच्या फ्लायओव्हरवर दाल रोटी खाताना दिसला. ती त्याने स्वताच कोठून तरी प्लॅस्टिक पिशवीतून आणली होती. या इसमाने सन 2015 साली असाच एका इसमाचा खात्मा केला होता. पण त्याच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा न आढळल्याने कोर्टात तो निर्दोष सुटला होता. आता पोलिस त्याच्या कडे अशाच प्रकारच्या अन्यही गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.