नवी दिल्ली : देशात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला नुकतीच परवानगी देण्यात आली आहे. ज्यानंतर आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास सुरुवात होणार आहे. यापूर्वी लसीकरणाची रंगीत तालीम, अर्थात ड्राय रन संपूर्ण देशात पार पडत आहे. लसीकरणाच्या ड्राय रनचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता देशात दुसऱ्या टप्प्यातील ड्राय रन पार पडणार आहे.
उत्तर प्रदेश आणि हरयाणाला वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे ड्राय रन आयोजित करण्यात आले आहे. ज्याअंतर्गत देशातील जवळपास 700 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे.
कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी आज केली जाणार असून राज्यस्तरावरुन जिल्ह्यांचे यूजर आयडी तयार करणे, जिल्हा स्तरावरुन आरोग्य संस्थेचे आणि लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करुन कोवीन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी आणि आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे आणि शितसाखळी केंद्राला कळवणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस आणि वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करुन त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी 2 जानेवारी 2021 ला कोरोना लसीच्या ड्राय रनचा पहिला टप्पा पार पडला होता. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीबाबतची जागरुकता आणि प्रशिक्षण देण्यासाठी, सोबतच अधिकाऱ्यांची कार्यक्षमता आणि तत्परता पडताळण्यासाठी हे ड्राय रन पार पडलं. याअंतर्गत 125 जिल्ह्यांमध्ये 285 ठिकाणांवर ही प्रक्रिया पार पडली.
केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाच्या माहितीनुसार 2 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या ड्राय रन प्रमाणेच तीन प्रकारच्या स्थळांची पाहणी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य संस्था (जिल्हा रुग्णालय/ वैद्यकिय महाविद्यालय), खासगी आरोग्य संस्था आणि ग्रामीण अथवा नागरी संस्थांचा समावेश असेल.