सांगवी – मराठा समाजाला केंद्रीय स्तरावरून आरक्षण मिळाले पाहिजे, त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी या मागण्यांना औरंगाबाद, नाशिक येथून सुरुवात झाली असून, पुण्यातूनही एल्गार केला जाईल, असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक व छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन गवांडे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी छावा मराठा संघटनेच्या माध्यमातून पुन्हा दिल्लीपर्यंत धडक देण्याची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
सर्वोच्च न्यायालयात अडकलेले सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्गातील आरक्षण मार्गी लागेल, स्थगिती उठेल, त्यासाठी सबळ पुरावे सादर करून विधिज्ज्ञ सक्षमपणे मांडणार आहेत; परंतु असे असले तरी केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीवर धडक देणार आहे.
लोकसभेचे अधिवेशन सुरू होताच आंदोलनाची तारीख जाहीर करू, अशी माहिती जाधव, सचिन गवांडे पाटील यांनी दिली.