भोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये अनेक सर्जिकल स्टाईक, 370 कलम हटवण्याचे काम केले. विकास हा मोठया लोकांचा केला नसून सर्वसामान्य जनतेचा केला. शरद पवार यांनी पंतप्रधान होण्याची स्वप्ने बघितली आणि तुम्ही मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघत राहाल असा टोला अजित पवार याचे नाव न घेता लगावत स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत, असा चिमटा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भोरमध्ये काढला.
भोर येथे भोर तालुका भाजपतर्फे आयोजित नरेंद्र मोदी-9 या पक्ष मेळाव्यात माजी खासदार किरीट सोमय्या बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, मुळशी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, अण्णा देशमाने, तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शहराध्यक्ष सचिन मांडके, महिला अध्यक्षा दीपाली शेटे, भोर शहर महिलाध्यक्षा स्वाती गांधी, खोपडे, सरपंच अमर बुदगुडे, पंकज खुर्द, विश्वास ननावरे, राजाभाऊ गुरव, सुनील कांबळे, राजेंद्र मोरे, ऍड. कपिल दुसंगे, वैभव धाडवे, दिलीप लोहकरे, अमर ओसवाल, नितीन सोनावले, राहुल दगडे आदी मान्यवरांसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सोमय्या म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार हे पाच ते पंधरा दिवसांनी काहीना काही मोठा बॉम्ब टाकतात. अजित पवार विरोधी पक्ष नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी जाहीरपणे मांडत आहेत. हा गोलमाल आहे. अशा गोंधळांमुळेच बारामती मतदारसंघात परिवर्तन नक्कीच होणार आहेल असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.
भोर नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा हातोडा फिरवणार
भोर नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे माझ्याकडे आली आहेत, यामध्ये अनधिकृत बांधकामे, पाणी चोरी, निकृष्ट दर्जाचे रस्त्याची कामे यांची माहिती घेऊन भोर नगरपालिकेतील भ्रष्टाचारावर हातोडा फिरवणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.