नवी दिल्ली – देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज (सोमवार,दि.24) पद आणि गापनीयतेची शपथ घेणार आहेत. या शपथग्रहण सोहळ्यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाईल.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉल येथे शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ देतील. देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती होणाऱ्या मुर्मू शपथग्रहण केल्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉल येथे उपस्थित असलेल्या सन्माननीय पाहुण्यांना उद्देशून भाषण करतील.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, अनेक राज्यपाल, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.