नगराध्यक्षपदावरून पायउतार; नगर विकास मंत्रालयाचा निर्णय, नगराध्यक्षांवर झालेली राज्यातील पहिलीच कारवाई
वाई -ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना 2017 मद्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपात सापडलेल्या वाई शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शासन आदेशानुसार सत्तेच्या खुर्चीतून अखेर पायउतार व्हावे लागले. प्रतिभा शिंदे यांच्यावर पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या नगरविकास मंत्रालयाच्या निर्णयानंतर नगराध्यक्षावर झालेली राज्यातील पहिलीच कारवाई समजली जात आहे.
सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या प्रतिभावंत तीर्थक्षेत्र वाई शहराची प्रतिमा प्रतिभाशून्य झाल्याने तमाम वाईकरांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 55 अ व ब तरतुदीनुसार नगर विकास राज्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दि. 4 ऑगस्ट रोजी त्यांना नगराध्यक्षपदावरून उर्वरित कालावधीसाठी दूर करण्यात आले आहे.
डॉ. प्रतिभा शिंदे नगराध्यक्षपदावर 2016 पासून कार्यरत होत्या. शहरामधील शौचालय बांधकामाचे ठेकेदार अमित रामचंद्र जायगुडे यांच्याकडून केलेल्या कामाचे बिल काढण्याच्या मोबदल्यात 14 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच पती सुधीर शिंदे यांच्यामार्फत स्वीकारताना रंगेहाथ सापडले होते. त्यामुळे शिंदे दाम्पत्याविरुद्ध 9 जून 2017 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. शिंदे या लोकनियुक्त लोकसेवक असल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा प्रस्ताव मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी शासनास सादर केला होता.
त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने शिंदे यांच्याविरुद्ध 22 मार्च 2018 रोजी अभियोग दाखल केला होता. त्यानंतर वाईच्या 16 नगरसेवकांनी डॉ. प्रतिभा शिंदे यांना पदावरुन हटवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांकडील भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी अहवाल कागदपत्रे विचारात घेऊन पुणे विभागीय आयुक्तांच्या शिफारशीने नगराध्यक्षपद रद्द करण्याची शिफारस शासनास केली होती.
डॉ. प्रतिभा शिंदे व पती सुधीर शिंदे लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यावर त्यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासनाच्या नगर विकास खात्यामार्फत शिंदे यांची चौकशी सुरू असताना शिंदे यांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.
प्रतिभा शिंदे यांनी निवडून येताच काही दिवसांनी ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी पती सुधीर शिंदे यांच्यामार्फत लाचेची मागणी करून वाई शहराच्या संस्कृतीला काळिमा फासला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडूनही राज्यात भाजप सरकार असल्याने शिंदे लाच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यास अखेर न्याय मिळून भ्रष्टाचारी नगराध्यक्षांना सत्तेच्या खुर्चीतून नियतीने पायउतार केले आहे
– अनिल सावंत (नगराध्यक्ष, वाई)
लाच स्वीकारून तीर्थक्षेत्र वाईला अपवित्र करून संपूर्ण वाईकरांचा नगराध्यक्षांनी विश्वासघात केला होता. उशिरा का होईना त्यांना सत्तेच्या खुर्चीतून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाई शहराचा विकास खुंटला होता. यापुढे शहरातील अडकलेली विविध विकास कामे आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पूर्णत्वास जातील
– प्रदीपदादा चोरगे (नगरसेवक, वाई)