डॉ. अर्जुन चव्हाण यांना ‘हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांना नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलनामध्ये ‘हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी विश्व हिंदी परिषदेचे महासचिव डॉ. विपिन कुमार, संयोजक प्रा. डॉ. माला मिश्र, राजभाषा विभाग आणि दिल्ली महानगर पालिकेच्या आयुक्त रश्मी सिंह आदी उपस्थित होते.

महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने विश्व हिंदी परिषद, दिल्ली व राजभाषा विभाग, भारत सरकार यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध हिंदी लेखिका व गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते झाले. या संमेलनात हिंदी साहित्यात केलेले भरीव लेखन व हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मॉरिशस, श्रीलंका, इंडोनेशिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका या देशांसह भारतातील निवडक हिंदी साहित्यिकांचा ‘हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यात डॉ. चव्हाण यांचा समावेश होता.

डॉ. अर्जुन चव्हाण यांना सदर संमेलनात “गांधी और राष्ट्रभाषा हिंदी” या विषयाचे विवेचन करण्यासाठी “विशेष अतिथी” म्हणून निमंत्रित केले होते. “बहुआयामी गांधी: विविध परिदृश्य” हा या संमेलनाचा मुख्य विषय होता. गांधीजींच्या जीवन व कार्यासंबंधी इतर ३६ उपविषय विवेचनासाठी होते. डॉ. चव्हाण यांना यापूर्वी ‘हिंदी साहित्य अकादमी, मॉरिशस सन्मान, ‘साहित्य शिरोमणी सन्मान’, ‘भारतेन्दु भूषण सन्मान’ व ‘युवा प्रेरक मार्गदर्शक सन्मान’ यांसारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना ‘अनुवाद चिंतन’ या ग्रंथासाठी ‘हिंदी साहित्य अकादमी’ (मुंबई) सन्मान’ व ‘सुब्रमण्य भारती साहित्य सेतु, जीवन गौरव सन्मान’ तसेच ‘अनुवाद समस्याएँ एवं समाधान’ या ग्रंथासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ‘अहिंदी भाषी हिंदी लेखक राष्ट्रीय सन्मान’ देऊन गौरविले आहे.

डॉ. चव्हाण यांचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी. एस. पाटणकर यांनी अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)