नवी दिल्ली – भारताची बिगर बासमती तांदूळ निर्यात 2013-14 या आर्थिक वर्षातील 2,925 दशलक्ष डॉलरवरून 2021-22 आर्थिक वर्षात 6,115 दशलक्ष डॉलर इतकी वाढली आहे. ही वाढ तब्बल 109 टक्क्यांनी म्हणजे दुपटीने वाढली आहे.
डीजीसीआयएसच्या आकडेवारीनुसार, भारताने 2021-22 मध्ये जगभरातील 150हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात केला. भारताने 2021-22 मध्ये नोंदवलेले 150 देशांपैकी 76 देशांना 1 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त तांदूळ निर्यात केला. गेल्या काही वर्षांतील भारतातील तांदूळ निर्यातीमधील वैविध्य दाखवणारी ही आकडेवारी आहे.
भारताने 2019-20 मध्ये 2,015 दशलक्ष डॉलर किमतीचा बिगर-बासमती तांदूळ निर्यात केला होता, जो 2020-21 मध्ये 4,799 दशलक्ष डॉलर आणि 2021-22 मध्ये 6,115 दशलक्ष डॉलर झाला. 2021-22मध्ये निर्यातीत 27 टक्के वाढ नोंदवली गेली आणि सर्व कृषी वस्तूंमध्ये बिगर-बासमती तांदूळ 6,115 दशलक्ष डॉलर इतके परकीय चलन कमावणारा अव्वल होता, असे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दरम्यान, कृषी निर्यातीत झालेली ही लक्षणीय वाढ देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची साक्ष म्हणूनही पाहिली जाते आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, आसाम आणि हरियाणा ही मुख्य तांदूळ उत्पादक राज्ये आहेत. पश्चिम आफ्रिकन देश बेनिन हा भारतातून बिगर बासमती तांदळाचा प्रमुख आयातदार आहे.