पुणे – ग्राहक कमी असल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात उलाढाल कमी प्रमाणात झाली. उत्पादन केद्रात दरवाढ झाल्यामुळे तुरडाळीतील घसरण थांबून दरात क्विंलमागे पाचशे रुपयांची दरवाढ झाली. गोटा खोबरेही दहा किलोमागे शंभर रुपयांनी महागले. गव्हाच्या दरवाढीमुळे रवा, मैदा आणि आटा दरातही पोत्यामागे पंचवीस ते तीस रुपयांनी वाढ झाली. मात्र, मागणी कमी असल्यामुळे बेसन भावात ५० किलोमागे पन्नास रुपयांनी घट झाली.
गेले अनेक दिवस मंदीत असलेल्या तुरडाळीच्या दरातील घसरण गेल्या आठवडयात थांबली. घसरलेल्या दरात खरेदी सुरु झाल्यामुळे आणि सटोडियांच्या सक्रियतेमुळे गेल्या आठवडयातच तुरडाळ दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांची दरवाढ झाली. मागणी कमी असल्यामुळे अन्य सर्व डाळी तसेच कडधान्यांचे दर स्थिर होते.
दरम्यान, साखर स्थिर तर गुळाचे भाव तेजीत आहेत. सध्या बाजारात साखरेची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. मात्र मागणी कमी आहे, यामुळे गेल्या आठवडयात साखरेच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. पुढील महिन्यासाठी जाहीर होणाऱ्या कोटयाच्या प्रमाणावर यापुढील तेजी मंदी अवलंबून असेल, असे सांगण्यात आले.
सध्या गुऱ्हाळांना ऊसाचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे गुळाचे उत्पादन मंदावले असून बाजारात गुळाची आवक रोडावली आहे. परिणामी, संक्रांतीनंतर गुळाच्या भावात अपेक्षित असलेली घसरण झाली नाही. उलट सर्व प्रकारच्या गुळाचे दर तेजीतच असल्याचे सांगण्यात आले. तर, रवा, मैदा दरात वाढ, बेसन उतरले आहे. गव्हाचे जुने साठे संपत आल्यामुळे गव्हाचे दर तेजीकडे झुकले आहेत. आटा, रवा, मैदा तयार करणाऱ्या रोलर फ्लोअर मिलर्संना लागणारा मिलबर गव्हाचे दर वाढले आहेत. यामुळे गेल्या आठवडयात आटा, रवा आणि मैद्याच्या दरात दहा किलोमागे पंचवीस ते तीस रुपयांनी वाढ झाली.
हरभरा डाळीचे दर उतरल्यामुळे आणि मागणी अभावी बेसन दरात ५० किलोमागे ५० रुपयांनी घट झाली. उत्पादन केंद्रात आधारभूत दराने गोटा खोबऱ्याची खरेदी सुरू झाली आहे. यामुळे दरातील घसरण थांबली असून गेल्या आठवडयात दरात दहा किलोमागे शंभर रुपयांनी वाढ झाली.
मागणी अभावी पोहे, मुरमुरे, नारळ या जिनसांचे दर स्थिर होते. नव्या मिरचीची आवक सुरु झाल्यामुळे दरात अलिकडेच मोठया प्रमाणात घसरण झाली आहे, ही स्थिती गेल्या आठवड्यातही कायम होती. कमी झालेल्या दरात खरेदी सुरु झाल्याचे सांगण्यात आले. उठाव साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी आणि बाजरीचे दर टिकून होते. नव्या तांदळाची आवक चांगली असून मागणीही चांगली असल्याचे सांगण्यात आले.
घाऊक बाजारातील भाव पुढीलप्रमाणे
- साखर (प्रतिक्विंटल) ३८०० ते ३८५० रु. खाद्यतेले (१५ किलो/लिटर):- शेंगदाणा तेल २६००-२७००, रिफाइंड तेलः २४००-३१५०, सरकी तेल १३५०-१६००, सोयाबीन तेल १४००-१५५०, पामतेल १३००-१४५०, सूर्यफूल रिफाईंड तेल १४५०-१६००, वनस्पती तूप १३९०-१६५०, खोबरेल तेल २३०० रु.
- तांदूळ :- गुजरात उकडा ४०००-४५००, मसुरी ४०००-४५००, सोना मसूरी ५०००-५५००, एच.एम.टी. कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, ११२१-११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ७०००-८०००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१००००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, १५०९- ८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु.
- गहू – सौराष्ट्र लोकवन नं. १ ४३००-४५००, सौराष्ट्र लोकवन नं. २ ३८००-४०००, एम.पी. लोकवन नं.१ ३७००-४०००, नं.२ ३६००-३७००, सिहोर ५६००-५८००, सिहोरी ४२००-४३००, मिलबर ३०५०-३१४० रु.
- ज्वारी :- गावरान नं. १ ६५००-७०००, गावरान नं. २ : ५२००-५७००, नं. ३ : ४५००-५०००, दुरी नं. १: ४५००-४८००, दुरी नं. २ : ३८००-४२०० रु .
- बाजरी :- महिको ३६००-४०००, गावरान ३३००-३५००, हायब्रीड २९००-३२०० रु.
- गूळ:- गूळ एकस्ट्रा ४२००-४४००, गूळ नं. १ : ४१००-४२५०, गूळ नं. २ : ३९५०-४०५०, गूळ नं.३ : ३८००-३९००, गूळ नं. ४ : ३६५०-३७५०, बॉक्स पॅकिंग ३८००-४४००, रसायन विरहित ४५००-५२००, डाळी :- तूरडाळ १२५००-१५०००, हरभराडाळ ६८००-६९००, मूगडाळ १००००-१०७००, मसूरडाळ ७३००-७४००, मटकीडाळ ९८००-९९००, उडीदडाळ १००००-१२७०० रु.
- कडधान्ये:- हरभरा ६५००-६७००, हुलगा – ७५००-७८०० चवळी ७५००-९००००, मसूर ६५००-६६००, मूग १००००-१०५००, मटकी गावरान ९०००-९५००, मटकी पॉलिश ७८००-८०००, मटकी गुजरात ९०००-९५००, मटकी राजस्थान ७८००-८०००, मटकी सेलम ११०००-११५००, वाटाणा हिरवा ८०००- ९५००, वाटाणा पांढरा ६०००-६२००, काबुली चणा १००००-१६५०० रु.
- साबुदाणा :– साबुदाणा नं.१ : ७६००, साबुदाणा नं.२ : ७२००, साबुदाणा नं. ३ : ७००० रु. वरई भगर :- ११०००-१२०००, सावा भगर १००००-११०००, गोटा खोबरे १२००-१३०० रु.
- शेंगदाणा :- जाडा १०५००-१००००, स्पॅनिश – ११५०० घुंगरु ११५००, टीजे ९७००-९८००
- धने :- गावरान ९०००-१००००, इंदूर १२०००-१५००० रु.
- पोहे :- मध्य प्रदेश ४२००-४५००, पेण ४२००-४५००, मध्यम पोहा ४४००-४६००, दगडी पोहा ४४००- ४९००, पातळ पोहा ४९००-५४००, सुपर पोहा ४६००-५१००, भाजका पोहा ६५०-७००, मका पोहा ६००-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा राजनांदगाव (९ किलोस) ५५०, भडंग ८५०-१०००, घोटी ५३०, सुरती ५५० रु.
- रवा, मैदा, आटा – (५० किलोचा भाव) आटा १६००-१७००, रवा १७२५-१७७५, मैदा १७२५-१७७५,
- बेसन :- (५० किलोस) ३८५०-४१५० रु.
- मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २५०, मीठ दळलेले (५० किलोस) २७० रु.
- मिरची:- काश्मीरी ढब्बी ५००००-५५०००, ब्याडगी ४००००-४५०००, लवंगी तेजा २४०००-२५०००,
गुंटूर २००००-२२०००, खुडवा गंटूर ९०००-११०००, खुडवा ब्याडगी १३०००-१५००० रु. - नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग १२५०-१३५०, मद्रास २५५०-२६५०, पालकोल जुना १५००- १६००, सापसोल २१००-२७०० रु.