एका दिवसात 18 करोना रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसें-दिवस कमी होत आहे. मंगळवारी एकूण 246 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 520 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. मंगळवारी 18 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी 12 रुग्ण हे शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत होते.
गेल्या सात महिन्यांपासून शहरात ठाण मांडून बसलेल्या करोनाचा आलेख आता उतरणीस लागला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रोज एक हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते. परंतु सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दैनंदिन रुग्णवाढ घटण्यास सुरुवात झाली.
मंगळवारी केवळ 244 शहरातील आणि दोन शहराबाहेरील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 84275 इतकी झाली आहे. त्यापैकी 79278 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
करोनामुळे आतापर्यंत शहरातील 1447 तर शहराबाहेरील 578 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एकूण 2681 संशयित रुग्ण दाखल झाले. गेल्या दोन दिवसांतील संशयितांपैकी 2374 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 957 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.