पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा होत आहे. यात ऑनलाइन परीक्षेवेळी तांत्रिक अडचणी येत आहेत.
अशा परिस्थितीत सर्व परीक्षा सुरुळीत सुरू झाल्याचे विद्यापीठाचे म्हणणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न विचारत याविरोधात आता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विद्यापीठात सध्या वॉररूममधून ऑनलाइन परीक्षेचे नियोजन सुरू आहे. अन्य विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. पहिलीच ऑनलाइन परीक्षा असल्याने त्यात त्रुटी असतील. पण त्या दुरुस्त करणे अपेक्षित आहे.
त्यावर काहीच उपाययोजना होताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या सूचनांनुसार करोना पार्श्वभूमीवर कसे तरी परीक्षा रेटत नेणे, हाच प्रयत्न विद्यापीठाचा दिसून येत असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.