“मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका”- आशिष शेलार

मुंबई : मराठा आरक्षणावरून सध्या राज्याच्या राजकारणात गोंधळ सुरु आहे. एकीकडे राज्य सरकारने राज्यपालांना आरक्षणाच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले आहे. तर दुसरीकडे विरोधकांची टीका सुरुच आहे. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीमध्ये सगळे हास्यास्पद सुरु असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणातले महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका अशा शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर ते पुढे म्हणतात, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोच चव्हाण यांनी आरक्षणाचं जाऊद्या, सवलती द्या अशी भूमिका घेतली आणि काल मंत्री राज्यपालांची भेट घेताना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. या त्यांच्या भूमिकेमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सरकार मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्याचबरोबर, मराठा आरक्षणाबद्दलच्या गायकवाड अहवालाचे भाषांतर करण्यात आले नाही आणि त्यामुळे या अहवालातले प्रमुख मुद्दे योग्य पद्धतीने समोर आले नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.