कोरोना संसर्गाविरोधातील युद्धात ‘स्टिरॉईड’ हे डॉक्टरांच्या हाती असलेलं एक महत्त्वाचं शस्त्र मानलं जात आहे. पण, ‘स्टिरॉईड’ चा अनियंत्रित वापर, दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चाललाय. गंभीर स्वरूपाचा कोरोनासंसर्ग झालेल्या रुग्णांचा ‘स्टिरॉईड’ मुळे जीव वाचतोय. पण, याच्या भरमसाठ वापरामुळे साईड इफेक्ट होण्याचा धोका असतो. “स्टिरॉईड हे एक दुधारी शस्त्र आहे. याचा योग्यवेळी आणि प्रमाणात वापर केला पाहिजे,” असं इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात. ‘स्टिरॉईड’ च्या अनियंत्रित वापराने संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो.
‘स्टिरॉईड’ मुळे संसर्ग वाढण्याची शक्यता?
कोरोनारुग्णांवर उपचार करताना योग्य वेळेआधी ‘स्टिरॉईड’ दिल्यास, कोरोनारुग्णांचा संसर्ग अधिक बळावण्याची किंवा गंभीर होण्याची शक्यता असते. कोरोना संसर्गाच्या पहिल्या पाच-सात दिवसातच काही डॉक्टर्स रुग्णांना ‘स्टिरॉईड’ देत असल्याचं दिसून आलंय. संसर्गाच्या पहिल्याकाही दिवसात रोगप्रतिकारशक्ती व्हायरसविरोधात लढण्याचा प्रयत्न करत असते. याचवेळी ‘स्टिरॉईड’ दिल्यास व्हायरसचा गुणाकार (viral replication) होण्याचं प्रमाण वाढतं. रुग्णांना स्टिरॉईड केव्हा द्यायचे, डोस किती द्यावा हे डॉक्टरांनी लक्षात घेतलं पाहिजे. दिर्घकाळ स्टिरॉईडचा डोस देऊ नये. कोव्हिडविरोधात स्टिरॉईड हे सद्य स्थितीत एकच पॉवरफूल औषध आहे. ज्याने जीव वाचतोय.
अत्यंत सौम्य संसर्गात स्टिरॉईड वापरू नये. ऑक्सिजन लेव्हल 93 पेक्षा कमी असेल तर, आणि रुग्णालयात ऑक्सिजनची गरज असल्यास स्टिरॉईड द्यावं. स्टिरॉईडचा योग्य डोस, योग्य कालावधीकरता देण्यात यावा. 40 MG (मिलीग्रॅम) मिथाईल-प्रिन्डीसोलॉन इंजेक्शन दिवसातून दोन किंवा तीन वेळा किंवा 6 MG (मिलीग्रॅम) डेक्सामिथेसॉन 7 ते 10 दिवस द्यावी. कोव्हिड टास्कफोर्सने एप्रिल 2021 मध्ये, डेक्सामिथेसॉन इंजेक्शनचा मध्यम स्वरूपाचा आजार असलेल्या न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वापर करण्याची सूचना दिली होती. रुग्णाची परिस्थिती गंभीर असेल आणि रुग्णालयात बेड मिळत नसेल तर, त्या एक-दोन दिवसात स्टिरॉईड वापरायला हरकत नाही.
कोरोना संसर्गाचा एक साईड इफेक्ट म्हणजे फफ्फुसांमध्ये सूज (inflammation) येते. परिणामी उपचार करण्यासाठी डॉक्टर डेक्सामिथेसॉन नावाचं स्टिरॉईड वापरतात. कोरोनासंसर्गामुळे सूज आल्यानंतर होणारा संसर्ग कमी करण्यासाठी स्टिरॉईड प्रभावी आहे. पण, याचा वापर जबाबदारीने, योग्यवेळी आणि व्हायरसची वाढ रोखण्यासाठी करण्यात आला पाहिजे.
स्टिरॉईडचा वापर 2 मिलिग्रॅमपेक्षा जास्त असू नये. शक्यतो 1 मिलिग्रॅम ठेवण्यात यावा. उदाहरणार्थ, रुग्णाचं वजन 60 किलो असेल तर डोस 120 मिलिग्रॅमपेक्षा कमी, खरंतर 60 मिलिग्रॅम असावा. स्टिरॉईडचा डोस हळूहळू कमी करत न्यावा. अचानक बंद करू नये. तर, रुग्णाची स्थिती सुधारत नसेल तर, दुसऱ्या उपचारपद्धतीचा वापर करावा.
मधुमेही रुग्णांवर स्टिरॉईडचे होणारे परिणाम
स्टिरॉईडच्या अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा जास्त वापरामुळे कोव्हिडमुक्त रुग्णांमध्ये काळ्या बुरशीमुळे होणारा “म्युकरमायकॉसिस’ आजार प्रंचड वाढलाय. मुंबई, नाशिक, नागपूरसारख्या महानगरात काळ्या बुरशीमुळे नाक आणि डोळ्यांच्या संसर्गाचं प्रमाण प्रचंड वाढलंय. म्युकरमायकॉसिसमुळे रुग्णालयात येणाऱ्यांमध्ये मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. स्टिरॉईडमुळे रोगप्रतिकाशक्ती कमी होते आणि शरीरातील साखर वाढते. ज्यांना मधुमेह नसतो त्यांचीसुद्धा साखर वाढते.
स्टिरॉईडचा शरीरातील साखरेच्या प्रमाणावर परिणाम होतो. शरीरातील साखरेचं प्रमाण योग्य नियंत्रणात नसेल, तर, गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. देशात 77 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेही रुग्णांना कोव्हिडमध्ये स्टिरॉईडचा हाय डोस देताना डॉक्टरांनी त्यानंतर होणाऱ्या संसर्गावर लक्ष ठेवलं पाहिजे. स्टिरॉईडच्या अनियंत्रित वापराने ज्यांचा मधुमेह बॉर्डरवर असतो. त्यांच्यात बुरशीमुळे होणारे आजार वाढू शकतात.