पुणे – शहरात हॉट स्पॉट असलेल्या भवानी पेठ व शिवदर्शन भागात करोना संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढत असून झोपडपट्टीत जास्त बाधित असल्याचे समोर आले आहे. हा संसर्ग होण्याचे कारण पत्त्यांचे रंगणारे डाव तसेच वसाहत पातळीवर सरकारी सुलभ शौचालय ही प्रमुख कारणे असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जात आहे.
पर्वती दर्शन भागात करोना लॉकडाऊन काळात सोशल डिस्टन्सिंग आणि जमाव बंदीचे नियम मोडून जमेल तेथे पत्त्यांचे डाव रंगत आहेत. अशाच ठिकाणी पॉझिटीव्ह रुग्णासोबत पत्ते खेळले गेल्यामुळे घोळक्यातील बहुतांश जण करोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच, वसाहतीमध्ये राहणाऱ्यांची संख्या जास्त आणि त्यामानाने शौचालयांची संख्या कमी यामुळे या भागात अनेक जण सरकारी सार्वजनिक शौचालयाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असल्यानेही बाधितांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे मत आहे.
भवानी पेठेत सुद्धा लॉकडाऊन काळात एकत्र पत्त्यांचे डाव खेळणारे जवळपास सर्वच युवकांची करोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने हा टाईमपास अशांच्या जीवावर बेतणार आहे. यामुळे पत्त्यांचे डाव खेळण्याचे प्रकार तातडीने बंद होणे गरजेचे आहे. तसेच, सुलभ शौचालयाची स्वच्छता हा विषयही महत्त्वाचा ठरत आहे.
याबाबत संबंधीत भागात जनजागृती होणे गरजेचे असून यासाठी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगरसेवक रघुनाथ गौडा यांनी वस्तीतील कॉमन टॉयलेट बाहेर रद्दी कागद कट करून ठेवले आहेत. तसेच, त्यांचे कार्यकर्ते जाणाऱ्या नागरिकांना दाराच्या कडीशी थेट हाताचा संपर्क न होऊ देता कडीला हात लावण्याआधी कागदाने धरूनच कडी उघडावी किंवा बंद करावी तसेच वापरून झालेला कागद कचऱ्याच्या बादलीत टाकावा, अशा सूचना करीत आहेत. सदर कागद एकत्र करून ते जाळले जात आहेत.