पुणे – करोना विषाणू प्रादुर्भावाचा वाढता संसर्ग, दैनंदिन प्राप्त होणारी आकडेवारी आणि एकूण परिस्थितीचा विचार करता सोशल डिस्टन्सिंगसह गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच कडक निर्बंधाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
पुणे महापालिका, पुणे शहर पोलीस यांच्या वतीने रामटेकडी, सय्यदनगर, चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी (शेवटचा बस स्टॉप) या परिसराची पाहणी करण्यात आली. रामटेकडी, चिंतामणीनगर, सय्यदनगर येथील पाहणीप्रसंगी अशोक कांबळे, माजी नगरसेवक फारूक इनामदार, क्षेत्रीय अधिकारी कुंजन जाधव उपस्थित होते. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी येथील पाहणीच्यावेळी स्थानिक नगरसेविका रूपाली धाडवे, स्थानिक नगरसेवक बाळा ओसवाल, भीमा साठे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर, रवींद्र घोरपडे उपस्थित होते.
याशिवाय सहपोलीस आयुक्त सुनील फुलारी, डीसीपी झोन-4 चे सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर (वानवडी), महापालिका सहआयुक्त सुरेश जगताप, उपायुक्त अविनाश सकपाळ आदी उपस्थित होते.
या भागातील आढावा घेताना तेथील लोकसंख्या, झोपडपट्टी परिसर, दाट लोकवस्तीचा भाग, संशयित रुग्ण, बाधित रुग्ण, मृत्यू संख्या, परिसरात आजपर्यंत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, मनुष्यबळ, साधनांचा पुरवठा, परिसरातील नागरिकांची समस्या आणि मागणी, मास्क उपलब्धता, निर्जंतुकीकरणाचे नियोजन, सार्वजनिक स्वच्छता, नागिकांचे सहकार्य, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सूचना, येथील क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी समन्वय आणि नियोजन याविषयी चर्चा झाली.
यावेळी स्थानिक पातळीवर भाजीपाला विक्री प्रसंगी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यावर अग्रवाल यांनी नाराजी व्यक्त केली. कोथिंबीर खरेदी करण्यामुळे स्वतःचे अणि इतरांचेही जीव धोक्यात आणू नका. किमान येत्या मे महिन्यात सर्वांनीच सामूहिकपणे प्रभावी लढा देऊन यावर मात करू, स्वतःच्या काळजी बरोबरच कुटुंबीय आणि इतरांचीही काळजी घेण्याचे, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन अग्रवाल यांनी केले.