पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षापासून (2020-21) प्रत्येक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा चाळीस टक्के अभ्यासक्रम हा ई- लर्निंगच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहेत. तसेच, करोना आणि लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन अभ्यासक्रमाचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणीही करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले आहेत.
यासोबतच येत्या शैक्षणिक वर्षापासून स्वयम’च्या ऑनलाइन अभ्यासक्रमांचा अधिकाधिक वापर करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठात असणाऱ्या अभ्यासक्रमांची पुन्हा एकदा पडताळणी करून , त्यामध्ये विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असा इ-कंटेंट समाविष्ट करण्याच्या सूचना डॉ. करमळकर यांनी दिल्या आहेत. स्वयम’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार 20 टक्के क्रेडिट पॉइंटस मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना प्राचार्य आणि प्राध्यापकांना केल्या आहेत.
ई-लर्निंग प्लॅटफॉर्मसाठी लागणाऱ्या ई-कंटेंटसाठी राष्ट्रीय स्तरावरील ई-पाठशाला, स्वयम’ यांसारख्या सुविधा असणाऱ्या जागतिक स्तरावरील प्लॅटफॉर्मचा वापर करावा. यासोबतच विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या इएमआरसी, ई-कंटेंट स्टुडिओचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि प्राध्यापकांना या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक उपयोग होण्यासाठी जयकर नॉलेज रिसोर्स सेंटरच्या संचालकांनी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करायच्या आहेत.
त्यासोबतच विद्यापीठाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी चारही विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी आवश्यक त्या सूचना देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश डॉ. करमळकर यांनी दिले आहेत आहेत. ई-कंटेंट निर्मिती, ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विद्यापीठांच्या अधिष्ठातांना देण्यात आल्या आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी संपूर्ण उपाययोजना राबवायच्या आहेत, अशा स्पष्ट सूचना डॉ. करमळकर यांनी दिल्या.