प्रतिबंधित भागातही बिनधास्त संचार; करोनाच्या अटकावाला अडथळा
पुणे – करोना संक्रमणशील भाग वगळता बाकीच्या भागातील सर्व व्यवहार सुरू करण्याचे आदेश रविवारी रात्री उशिरा पालिका प्रशासनाने दिले. मात्र कंटेंन्मेंट भागात या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. इतरांप्रमाणेच आपल्यालादेखील बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे, असे समजून या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने बॅंक, पेट्रोलपंप, किराणा मालाची दुकाने याठिकाणी गर्दी केली होती.
शहरातील जवळपास 69 ठिकाणे ही अतिसंक्रमणशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने शहरातील मध्यवस्तीचा भाग, प्रमुख पेठा तसेच कोंढवा, मुंढवा, घोरपडी, लडकतवाडी, ढोले पाटील रस्ता, पुणे स्टेशनचा परिसर, ताडीवाला रोड, यांचा समावेश आहे.
संक्रमणशील भाग वगळता इतर भागातील सेवा अंशत: सुरू करण्यात येतील असे पालिका प्रशासनाने सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील या भागात नागरिकांची वर्दळ वाढली. मोठ्या संख्येने वाहनांची रहदारी वाढल्याचे दृश्य पाहवयास मिळाले. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. असे असले, तरी नागरिकांची वाढलेली गर्दी चिंतेचा विषय ठरली. लष्कर परिसरात काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. नागरिक शिस्तीत योग्य अंतर ठेवून किराणा मालाच्या दुकानाबाहेर उभे होते.
व्यवहार सुरू झालेल्या भागात आपलाही समावेश केला आहे असा समज झाल्याने लोक घराबाहेर पडले. पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती.
पेठांमध्ये मात्र शांतता
सोमवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठेसह एम. जी. रोड, बाबाजान चौक, गोळीबार मैदान, मंगळवार पेठ हा भाग करोना अतिसंक्रमणशील आहे. सोमवारी या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. जीवनावश्यक व आरोग्यविषयक महत्त्वाच्या सेवा वगळता अन्य कुठलीही सेवा या भागात सुरू नव्हती. सध्या शहरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण या भागातून असून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.