सातारा (प्रतिनिधी) – सातारा व जावळी तालुक्यातील कंटेंनमेंट झोनमध्य असणाऱ्या गावांमध्ये किराणा माल घरपोच पोहचविण्याच्या सुविधेला जिल्ह्धाकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. सातारचे प्रांताधिकारी याबाबतची यंत्रणा उभारणार आहेत. त्यानुसार किराणा सामान घरपोच मिळणार आहे.
सातारा कंटेनमेंट झोनमध्ये करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सातारा व जावळी तालुक्यात कलम 144 मधील तरतुदीप्रमाणे पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत किराणा मालाचा पुरवठा करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा व जावळी तालुक्यातील या झोनमधील गावांमध्ये अत्यावश्यक सेवेतील किराणा माल साहित्य घरपोच पुरविण्यासाठी सातारचे प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यंत्रणा उभारतील त्याप्रमाणे किराणा माल साहित्य घरपोच पुरविण्यात येणार आहे.
सातारा नगरपरिषद क्षेत्रासह ग्रामपंचायत क्षेत्रात किराणा साहित्य घपोच पुरविण्यास सुट दिली आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर व धनगरवाडी या ग्रामपंचायत क्षेत्रात व सातारा नगरपालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र या संपूर्ण क्षेत्राचा समावेश आहे. तसेच जावळी तालुक्यातील धनकवडी, निझरे, करंदी त. मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी त मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बु., वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर त मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी त मेढा, सावली या 27 गावांसह मेढा नगरपंचायत क्षेत्रात किराणा साहित्य घरपोच पुरविण्यास मुभा देण्यात आली आहे.