संतोष पवार
सातारा – सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता आणि राहील या दृष्टीने पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काम अपेक्षित आहे. वशिलेबाजी न करता पक्षीय काम दाखवणाऱ्यांनाच यापुढे पक्षात संधी मिळणार असून पक्षीय कामाला प्राधान्य देत बालेकिल्ला अबाधित ठेवा, असा कानमंत्र पक्षाचे नेते, विधआनसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. श्री. पवार यांनी अनेक मुद्यांवर कान टोचल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकदा चार्ज होण्यास मदत मिळणार आहे.
पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पक्षाची पडझड झाली आहे. भाजपने काही प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यातच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषद, सातारा पंचायत समिती, जावळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस काही प्रमाणात बॅकफूटवर गेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सातारा लोकसभा मतदारसंघ, विधानसभेचे फलटण, वाई आणि कराड उत्तर वगळता अन्य कोणताही मतदारसंघ नाही. पाटण, कराड दक्षिण, कोरेगाव, सातारा, माण या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नेहमीच ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीदेखील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची हानी होत आहे.
गेल्या चार दिवसांत अजित पवार यांचे जिल्ह्यात दोन दौरे झाले. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. अनेक तालुक्यात अंतर्गत गटबाजी असल्याचे त्यांच्या कानावर गेले. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत झालेली जिरवाजिरवीही श्री. पवार विसरु शकलेले नाहीत. या मुद्यांवरुन पवारांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वडूज येथील मेळाव्यात चिमटे काढले. आता वशिलेबाजी न करता पक्षीय काम करणाऱ्यांनाच पक्षात संधी मिळेल असा इशाराच त्यांनी दिला. अंतर्गत गटबाजीला अजिबात थारा दिला जाणार नसून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी आ. मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील घडामोडींची माहिती घेतली.
मेढा येथे अमित कदम यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात श्री. पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा नामोल्लेख पवार यांनी टाळला असला तरी मेढा येथील मेळावा म्हणजे आ. शिवेंद्रसिंहराजे यांना एक आव्हानच असल्याचे बोलले जात आहे. या मेळाव्यातही अजित पवार यांनी पक्षशिस्तीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. एकंदर गेल्या चार दिवसांत अजित पवार यांच्या दोन दौऱ्यांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले असून अजित पवारांचा कानमंत्र ऐकून पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाच्या कामाला प्राधान्य देणार का हे आगामी काळच सांगणार आहे.
दीपक पवार यांचे खडे बोल
मेढा येथील मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दीपक पवार यांनी विरोधक व स्वपक्षियांवरही जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी भाजपच्या याठिकाणच्या आमदारांना भरघोस निधी दिला. आम्ही ज्यांच्या विरोधात निवडून लढवून 70 हजार मते मिळवली त्यांनाच पक्षाकडून एक प्रकारे मदत झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य भाजपच्या व्यासपीठावर जाऊन भाजपचा प्रचार करत होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना संबंधितांना नोटीसा काढा असे सांगितले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. अशा प्रकारांमुळे स्वपक्षियांची गोची होते, अशा शब्दांत दीपक पवार यांनी खडे बोल सुनावले.