पुणे – शहरासह उपनगरांमध्ये मंगळवारी सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. कोथरूडमध्ये अर्धा तास पडलेल्या पावसात काही भागांमध्ये गारा पडल्या. ठिकठिकाणी पाणी साचले तर, काही नागरिकांना गारांचा मारा बसला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू असून, पुणे शहरात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दोन दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागांत सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. विश्रांतीनंतर मंगळवारी पश्चिम उपनगरांतील कोथरूड, वारजे, कात्रज, पाषाण भागांत वादळी पाऊस झाला. शहर आणि अन्य उपनगरांत हलक्या सरी पडल्या.
सायंकाळी सहाच्या सुमारास कोथरूड परिसरातील धो-धो पावसाला सुरवात झाली. यावेळी शास्त्रीनगर, सागर कॉलनीसह आसपासच्या परिसरात गारांचा पाऊस झाला. येथील काही घरे पत्र्याची असल्यामुळे गारांमुळे पत्रे वाकले, गारांचा मारा लागत असल्यामुळे नागरिकांनी धांदल उडाली.