लोणावळा : पत्रकार हा केवळ एक नागरिक नाही तर नवी दिशा दाखविणारा मार्गदर्शक आहे. लोकमत बनविण्याचे जबरदस्त शस्त्र म्हणजे शब्द आहे. माणसाचे जीवन घडविण्याचे आणि माणसाचे जीवन उंचावण्याचेही सामर्थ्य शब्दांत आहे. शब्दांचे सामर्थ्य अण्वस्त्राहूनही मोठे आहे, असे आज परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले. मराठी पत्रकारांची परंपरा फार मोठी आहे. जुन्या पिढीतील राष्ट्रीय पुढारी पत्रकार होते. त्यांच्यात निर्भयता होती, सत्यप्रियता होती आणि आपण लिहू त्याचे परिणाम भोगण्याची तयारीही होती. आताही निर्भय पत्रकारांचीच खरी गरज आहे.
संस्कृत-कोशाचे प्रकाशन
पुणे – परराष्ट्र व्यवहार मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डेक्कन कॉलेजमधील ज्ञानकोशवजा संस्कृत शब्दकोश प्रकल्प विभागास भेट दिली. डेक्कन कॉलेजचा संस्कृत शब्दकोश विभाग आणि पुणे विद्यापीठाचा भाषाशास्त्र विभाग यांनी हा शब्दकोश तयार केला आहे.
नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रमुखपदी शेख अब्दुल्ला
जम्मू- जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतील. शेख अब्दुल्लांनी गेल्यावर्षी या पक्षात प्रवेश केला. 24 व 25 एप्रिल रोजी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे.