न्यूयॉर्क – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्तंभलेखिका ई. जीयन कॅरोल यांचे 1996 मध्ये लैंगिक शोषण केले आणि त्यांची बदनामीही केली, असा ठपका मॅनहटन फेडरल ज्युरींनी ठेवला आहे. या प्रकरणी ट्रम्प यांनी कॅरोल यांना 5 दशलक्ष डॉलरची भरपाई द्यावी, असे आदेशही न्यायालयाने ट्रम्प यांना दिले आहेत. न्यायालयाच्या या निकालामुळे पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील ट्रम्प यांचा मार्ग अधिकच खडतर बनला आहे.
ट्रम्प यांनी कॅरोल यांचे लैंगिक शोषण केले, असे ज्युरींनी म्हटले आहे. अश्लील अंगविक्षेप केल्याबद्दल ट्रम्प यांना जबाबदार धरण्यात आले. मात्र ट्रम्प यांनी बलात्कार केल्याचे कॅरोल सिद्ध करू शकल्या नाहीत, असेही ज्युरींनी म्हटले आहे. बर्गडॉर्फ गुडमनच्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये ट्रम्प यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा आरोप कॅरोल यांनी केला होता.
या घटनेनंतर ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे हे प्रकरण बनावट असल्याचा दावा करून आपली बदनामी केली होती, असा दावाही कॅरोल यांनी केला होता. ट्रम्प यांनी पोर्न स्टार स्टॉर्मी ड्रमिएलला मोठ्या रकमेची लाच दिल्याबद्दल मॅनहटन न्यायालयाने ट्रम्प यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यानंतर काही दिवसाच कॅरोल यांच्या प्रकरणीही ट्रम्प यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.