मुंबई – स्टार किड्सच्या यादीमध्ये टॉपला असणारी अभिनेत्री जान्हवी कपूरचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवीने एकदम कमी वयामध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. ‘धडक’ हा मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक असून त्यामध्ये जान्हवीने काम केले आहे.
विशेष म्हणजे लोकांनी जान्हवीची तुलना तिच्या आईशी म्हणजेच श्री देवीशी केली आहे. तिचा लूक असो, तिचे डायलॉग डिलिव्हर करण्याची स्टाईल आणि अभिनय या सगळ्याचं गोष्टींची तुलना करण्यात आली आहे.
आता नुकतेच जान्हवीच्या ‘उलझ’ या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. त्याची पहिली झलक देखील समोर आली आहे. या सिनेमात ती भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा देशभक्तीवर आधारित असणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस या सिनेमाचे शूटींग सुरु होणार आहे.
या सिनेमात जान्हवीसोबत गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. शिवाय या सिनेमात राजेश तैलंग, मीयांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.
दरम्यान, जान्हवी कपूर या सिनेमाशिवाय ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘बवाल’ या सिनेमामध्येही दिसणार आहे. तसेच सध्या ती ज्युनियर एनटीआरसोबत ‘एनटीआर 30’ हा सिनेमाही करत आहे.