मेलबर्न – ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि जर्मनीचा ऍलेक्झांडर ज्वेरेव्ह यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात संघर्षपूर्ण खेळ करत विजयी सलामी दिली. तसेच सर्बियाचा अव्वल मानांकित नोवाक जोकोवीच, स्टॅनिस्लास वॉवरिंका यांनी पुरुषांमध्ये, तर, सिमोना हालेप यांनी महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या मानांकित थीमने कझाकस्तानच्या मिखाईल कुकुश्कीनला 7-6 (7-2), 6-2, 6-3 असे तीन सेटमध्ये पराभूत केले. परंतु या विजयासाठी थीमला तब्बल दोन तास 40 मिनिटे संघर्ष करावा लागला. दुसऱ्या फेरीत थीमचा डॉमिनिक कोपफरशी सामना होईल. सहाव्या मानांकित ज्वेरेव्हने अमेरिकेच्या मार्कस गिरोनवर 6-7 (8-10), 7-6 (7-5), 6-3, 6-2 अशी पिछाडीवरून सरशी साधली. आता दुसऱ्या फेरीत ज्वेरेव्हची मॅक्सिम क्रीजीशी गाठ पडणार आहे.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या जोकोवीचने फ्रान्सच्या जेरेमी चॅर्डीचा 6-3, 6-1, 6-2 असा धुव्वा उडवला. जोकोव्हिचला पुढील लढतीत फ्रान्सेस टिआफोएचा सामना करायचा आहे. स्वित्झर्लंडच्या 17 व्या मानांकित वॉवरिंकाने प्रेडो सौसावर 6-3, 6-2, 6-4 असा विजय मिळवला. जपानच्या केई निशिकोरीला मात्र स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाने 7-5, 7-6 (7-4), 6-2 असे नमवून त्याचे आव्हान संपुष्टात आणले.
महिला एकेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित नाओमी ओसाकाने अनास्ताशिया पावल्यूचेनकोव्हाचा 6-1, 6-2 असा पराभव केला. रोमानियाच्या दुसऱ्या मानांकित हॅलेपने लिझेट कॅबेरावर 6-2, 6-1 असे वर्चस्व मिळवले. जर्मनीच्या 23 व्या मानांकित अँजेलिक कर्बरला मात्र बेनार्डा पेराने 6-0, 6-4
असे नमवले.
प्रेक्षकांचा निरूत्साह
ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फक्त 30 हजार प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली. रॉड लेव्हर व मार्गारेट कोर्ट या दोन्ही एरियांमध्ये मिळून एकूण एक लाखपर्यंत प्रेक्षकसंख्येची क्षमता आहे. सध्या करोनाचा धोका कायम असल्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तरी टेनिस शौकिनांनी सामन्यांकडे पाठ फिरवली.