Pune Crime : पुणे शहरात गोळीबारांचे सत्र कायम आहे. नऱ्हे भागातील भूमकर चौकात मध्यरात्री एका तरुणावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घटना घडली. पुण्यात दोन दिवसात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गोळीबाराच्या घटनेत गणेश गायकवाड (२७, रा. रामनगर, धायरी ) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी ब्रम्हानंद निवृत्ती कांबळे (३१, रा.नऱ्हे) आणि गोपाळ पांडुरंग सुरवसे( ३०,रा. नऱ्हे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही मजुरी काम करतात.
गणेश आणि त्याचा मित्र आकाश धोंडगे (२४) हे वाढदिवसाच्या डेकोरेशनची कामे करतात. ते दोघे बुधवारी रात्री मद्यपान करण्यास गेले होते. तेथून पुन्हा ते नवले पुलाजवळील एका बारमध्ये मद्यपान करण्यास गेले. तेथे अगोदरच चौघेजण दुसऱ्या टेबलवर मद्यपान करत बसले होते.
रात्री दिडच्या सुमारास त्यांच्यामध्ये माचीसवरुन बाचाबाची झाली. यानंतर हॉटेल बंद झाल्यावर पदपथावरही त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. दरम्यान चौघांपैकी दोघे दुचाकीवरुन निघुन गेले. गणेश आणि आकाशने त्यांचा पाठलाग करत भुमकर चौकात अडवले. यानंतर त्यांना चॅलेंज दिले.
वाद वाढल्याने समोरच्या एकाने पिस्तूल काढून गणेशवर गोळीबार केला. यात एक गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली. यानंतर गोळीझाडणारा साथीदारासह निघुन गेला. गणेशवर खासगी रुग्णालयात उपचार झाल्यावर, त्याने सकाळी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षिरसागर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, शिवाजी क्षिरसागर, देवा चव्हाण, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विकास बांदल, स्वप्नील मगर, अमोल पाटील, यांच्या पथकाने केली.