इंदापूर, (प्रतिनिधी) -लोकसभेचा एकत्र प्रचार करायचा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या व इतर मित्र पक्षांवर नेत्यांवर कोणतीही दोन महिने टीका टीपणी करु नका, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना जाहीर सभेतच दिला. उलट एकमेकांच्या पक्ष कार्यालयात चहापानाला जावा, असा सल्ला द्यायला ते विसरले नाहीत.
त्यामुळे इंदापूर तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी एकत्र चहा कधी घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे व भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मागील काही वर्षापासून, आजपर्यंतच्या राजकारणात जी टीका झाली नाही. ती टीका उघडपणे गावागावातील सभेत करत आहेत; मात्र राज्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तसेच शिंदे गट शिवसेना एकत्र सरकारमध्ये आहेत.
त्यामुळे ते मित्रपक्ष झाले आहेत. याचा विसर इंदापूर तालुक्यात पडलेला दिसत होता. एवढेच काय; परंतु माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील एकमेकावर संधी मिळाल्यास आपल्या शाब्दिक फटकार्यातून सोडत नव्हते. 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर, खर्या अर्थाने इंदापूर तालुका टीकेचे केंद्र बनला होता.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, भाजप युवा मोर्चाचे कोर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील व अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रोजच एकमेकांवर शाब्दिक प्रहार करत होते. भाजपचे युवक नेते राजवर्धन पाटील अंकिता ठाकरे पाटील यांनी, आधी विधानसभेचे ठरवू मग लोकसभेचा प्रचार करून मतदान देऊ अशी कार्यकर्त्यांची खदखद जाहीरपणे स्पष्ट केल्याने, यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देते हे अजित पवारांच्या जाहीर सभेत तालुक्यातील जनतेला ऐकायचे होते.
भाजपची भूमिका काय?
इथून पुढच्या काळात दोन महिने लोकसभा निवडणूक होईपर्यंत अजित दादांनी आखून दिलेली आचारसंहिता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, पाळतील; मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टी, आपल्या नेत्याला डिवचल्यामुळे अत्यंत आक्रमक झालेली आहे. त्यामुळे आपले पदाधिकारी कार्यकर्ते भाजप नेते हर्षवर्धन पाटील शांत करणार का? हा प्रश्न मात्र जनतेला पडलेला दिसतो.
पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटलांवर टीका नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय विस्तव राज्याला व देशपातळीवर माहिती आहे. इंदापूर तालुक्यात अजित पवारांची सभा म्हटले की भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका आली.
मात्र भाजपबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा काम करत असल्यामुळे अजितदादांच्या झालेल्या जाहीर सभेत हर्षवर्धन पाटलांवर एका शब्दानेही टीका नाही.