कराड – दिवाळी असो वा दसरा या दोनही सणांसाठी झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. यंदा दसऱ्याच्या वेळी आवक घटल्याने झेंडूच्या फुलांचा दर वधारला होता. त्या पार्श्वभूमीवर दिवाळीलाही झेंडू तेजीत राहील, अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षेनुसार दिवाळीच्या पूर्वसंध्येला झेंडू प्रतिकिलो दोनशेच्या घरात पोहाचला आहे. मात्र, लक्ष्मीपूजन दिवशी होणारी झेंडूची आवक घटल्यास हाच दर चारशे ते पाचशे रूपये किलोच्या घरात जाईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, लक्ष्मीपूजनादिवशी झेंडूची आवक वाढल्याने झेंडूचा दर प्रतिकिलो 100 ते 200 रूपयांच्या घरात स्थिर राहिला.
यंदा परतीच्या पावसाचा बसलेला तडाखा व करोनामुळे फुलांना मार्केट मिळाले नाही. अनेकांना आपली झेंडूसह मोकळ्या शेतात केलेली विविध प्रकारातील फुले कवडीमोल दराने विकावी लागली. तर अनेकांनी ती शेतातच टाकून दिली. यंदा मुळाच झेंडू फुलांची लागवड कमी झाली होती. जी होती त्या पिकाचे परतीच्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. परिणामी झेंडूची आवक घटली. घटलेल्या उत्पादनामुळे दसऱ्याला दराने मात्र उच्चांक केला.
आदल्या दिवशी शंभर रुपये किलोवर असलेला दर दसऱ्याच्या सकाळी तीनशे ते चारशे रुपयांवर गेल्याचे पहावयास मिळाले. हीच स्थिती दिवाळीत असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ऐन दिवाळीत झेंडूची आवक वाढल्यास दर कोसळण्याची शक्यता होती पंरतू, झेंडूची बाजारातील आवक जेमतेम असल्याचे दिसून आले.
करोना महामारी आणि सप्टेंबरमहिन्यात करोनाचा वाढता प्रार्दुभाव यामुळे दसऱ्याला बहुतांशी गाड्या व दुकानाच्या पाट्या हाराविना मोकळ्या पहावयास मिळाल्या. अनेकांना पूजेसाठी देखील फुले देखील मिळू शकली नाहीत. आणि वाढलेल्या दरामुळे व्यापारी वर्गाने हार न बनविता केवळ फुले वाहून पूजा मांडल्याचे दिसून आले. यंदाचा पहिलाच मोठा सण असलेल्या दसऱ्याला करोनामुळे विशेष उत्साह दिसून आला नाही. त्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने वाढलेल्या फुलांच्या दराचाही परिणाम झाल्याचे जाणवत होते.
सध्या करोना काही प्रमाणात का होईना आटोक्यात आल्याचे चित्र आहे. लोकांची भीती कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या खरेदीसाठी बाजरपेठ गजबजून गेली आहे. त्याच पद्धतीने झेंडू उत्पादकही बाजारपेठेत दाखल झाला आहे. दिवाळीत दसऱ्याच्या तुलनेत कमी दर मिळाला असला तरी झेंडू उत्पादकांनी यावर समाधान व्यक्त केले आहे.