पुणे – अग्रमानांकित नैशा रेवासकर व द्वितीय मानांकित सई कुलकर्णी यांनी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतील मुलींच्या 10 वर्षाखालील गटात अंतिम फेरी गाठली. ही स्पर्धा सन्मित्र क्रीडा संकुल (कोथरूड) येथे रेडियंट अकादमीने आयोजित केली आहे.
रेवासकरला पाचव्या मानांकित आद्या गवात्रेने चिवट लढत दिली. रेवासकरने हा सामना 11-5, 9-11, 11-9, 11-0 असा जिंकताना टॉपस्पीन फटक्यांचा बहारदार खेळ केला. कुलकर्णीने तृतीय मानांकित प्रिशा ठाकूरचा 11-7, 11-6, 15-13 असा पराभव केला. 12 वर्षाखालील मुलींच्या गटात मात्र रेवासकर व सई यांना पराभवास सामोरे जावे लागले. नभा किरकोळने तिचा 11-6, 11-9, 11-9 असा पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
अग्रमानांकित देवयानी कुलकर्णीनेही उपांत्य फेरी गाठली. तिने काउंटर ऍटॅक पद्धतीचा खेळ करीत श्रिया शेलारला 11-1, 11-4, 11-6 असे पराभूत केले. रूचिता दारवटकरने सई कुलकर्णीचे आव्हान 11-0, 8-11, 11-5, 11-9 असे संपुष्टात आणले. आकांक्षा मार्कंडेयने सिद्धी झेंडे हिच्यावर 11-7, 12-10, 11-9 असा विजय मिळवित उपांत्य फेरीकडे वाटचाल केली.
मुलींच्याच 21 वर्षाखालील गटात अग्रमानांकित पृथा वर्टीकरने प्रीती गाडवेचा 11-7, 12-10, 11-6, 11-6 असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळविले. द्वितीय मानांकित स्वप्नाली नरळेने सिद्धी आचरेकरची विजयी वाटचाल 11-5, 11-5, 11-2, 11-5 अशी रोखली. तिने चॉप्सचा कल्पकतेने उपयोग केला. प्रिथिका सेनगुप्ताने संघर्षपूर्ण लढतीनंतर मृण्मयी रायखेलकरचा पराभव केला. तिने ही लढत 11-9, 11-2, 4-11, 11-8, 8-11, 11-3 अशी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. या वेळी संघटक सचिन देशपांडे, रोहित चौधरी उपस्थित होते.