पुणे – अनय एकबोटे व चिन्मय फणसे यांनी शानदार विजय मिळवित राज्य स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील मुलांच्या 10 वर्षाखालील गटात विजयी घोडदौड कायम राखली. मॉडर्न क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. अटीतटीने झालेल्या लढतीत फणसेने ए.व्ही.शर्मा या ठाण्याच्या खेळाडूचा 21-23, 21-13, 21-19 असा पराभव केला. पहिली गेम गमाविल्यानंतर त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला आणि विजयश्री खेचून आणली.
एकबोटेने साहिल वधवाला 21-14, 21-12 असे पराभूत केले. त्याने ड्रॉपशॉट्सचा कल्पकतेने उपयोग केला. याच गटात मयुरेश भुटकी याला ओम अमृतकर याच्याविरूद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. त्याने हा सामना 22-20, 22-24, 21-13 असा जिंकला. नील जोशीने तनिष्क आडे याच्यावर 21-11, 21-19 असा विजय नोंदविला. सचित त्रिपाठीने एकतर्फी सामन्यात निहाल रामुकाचा 21-5, 21-4 असा धुव्वा उडविला.
मुलींच्या 13 वर्षाखालील गटात निमिशा कोटेचाने संस्कृती पवारची विजयी घोडदौड 21-5, 21-12 अशी संपविली. श्रावणी वालेकरने रिया पाटीलचा 21-5, 21-3 असा पराभव करताना परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. श्रेया शिंदेने ज्ञानेश्वरी घुले हिला 21-18, 21-9 असे हरविले. तिने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला.
आदिती गावडेने निकिता देशपांडेवर 21-6, 21-2 असा दणदणीत पराभव केला. जिज्ञासा चौधरीने केतकी थिटेचा 21-12, 21-17 असा पराभव केला. निर्मिती गजभियेने रिया शहावर 21-13, 21-19 असा विजय मिळविला. शिवांजली थिटेने नुपूर ठकारला 21-8, 21-17 असे हरवित आव्हान राखले.