पळसदेव, (प्रतिनिधी) – बारामती येथे कौशल्यव उद्योजकता नावीन्यता विभागाच्या वतीने बारामती येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो महारोगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात ५ लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील जास्तीत जास्त युवक व्यावसायिक व्हावीत अगदी ग्रामीण भागात नवनवीन लहान मोठे व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत इंदापूर व बारामती भागातील ५ लाभार्थ्यांना या वेळी या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जाचे पत्र देण्यात आले.
यामध्ये इंदापूर तालुक्यातील शेळगावचे अतुल शिंगाडे, भिगवण येथील मनोज गोडसे व बावडा येथील आकाश लिगसे यांना तर बारामती तालुक्यातील ओंकार आटोळे खांडज, आदित्य फणसे कोऱ्हाळे या पाच लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले.
या वेळी जिल्हा उद्योग केंद्राचे सह संचालक शैलेश राजपूत, उद्योग उपसंचालक संजय बांगर, महाव्यवस्थापक पुणे वृषाली सोने, महाव्यवस्थापक संतोष कोलते, अजियकुमार पाटील, विद्या कुलकर्णी, उमेशचंद्र दांडघवाळ, श्रीजित नायर, उद्योग निरीक्षक अक्षय कळंत्रे उपस्थित होते.