इंदापूर, (प्रतिनिधी) – मागील काही दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नेत्यांना,मित्र पक्षांबरोबर कोणताही वाद न घालता चांगले संबंध ठेवा, असा आदेशच दिला. त्या क्षणापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाब्दिक बाण बंद झाले.
मात्र, भारतीय जनता पार्टी व हर्षवर्धन पाटील तसेच अंकिता पाटील ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात थेट गुंडाराज म्हणत मेळावे गाजवले. सध्या इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते एकजूट करत विरोधकावर आक्रमकपणे शाब्दिक हल्ला करत आहेत. त्यामुळे खुद्द अजित पवार यांनी दिलेला आदेश किती दिवस पदाधिकारी कार्यकर्ते नेते पाळतील, हे येणारे पुढचे काही दिवसच ठरवतील.
एकीकडे राज्यभर देशपातळीवर लोकसभेची तयारी सर्वच राजकीय पक्षांची सुरू आहे. यातच बारामती लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने काही महिन्यापासून प्रतिष्ठेचा केला आहे. मागील काही महिन्यापूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील या मतदार संघातून लढतील, असा अंदाज पुढे येत होता.
मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार फिक्स खासदार म्हणून इंदापूर तालुक्यातच बॅनर झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी बारामती लोकसभेचे घड्याळाचे बटन दाबायचे,असे जाहीर करून टाकून येथील लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असल्याचे जाहीरच केले.
भारतीय जनता पार्टीने हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी मागील काही वर्षांपासून मोठी ताकद राजकीय पुरवली आहे. तसेच राष्ट्रीय साखर सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर दिल्यामुळे, इंदापूर तालुक्यात भाजपला चैतन्य निर्माण झाले. मागील काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून हर्षवर्धन पाटील यांच्यावर कडाडून टीका झाली होती.
या टिकेला उत्तर संकल्प विजयाचा या जिल्हा परिषद गटागटामध्ये होणाऱ्या मेळाव्यात खुद्द माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच अंकिता पाटील ठाकरे यांनी आक्रमक पद्धतीने दिले आहे.
तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर विधानसभेत कमळ फुलवायचे हा संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून घेतलेला दिसतो आहे.त्यामुळे राज्यात मित्र पक्ष म्हणून युती असणाऱ्या,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यामध्ये कसा एकत्र प्रचार होणार असा घनघोर प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील गुंडाराज ला इंदापूर तालुक्यातील जनता वैतागली आहे. गुंडाराज हटाव इंदापूर बचाव अशी टीका अंकीता पाटील ठाकरे यांनी केलेली आहे.मला धमकी देणारा जन्माला यायचा आहे.बोलवेल तेथे येतो,असे आवाहनच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिल्यामुळे इंदापूर तालुक्यात विधानसभेची रंगीत तालीम रंगलेली आहे.
भरणेंच्या भूमिकेकडे लक्ष…
एकंदर भारतीय जनता पार्टीने इंदापूर विधानसभेची तयारी जोरदारपणे चालवलेली आहे. भिगवण,निमगाव केतकी,जंक्शन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.पहिल्यांदाच जोरदार टीका विरोधकांवर या मेळाव्यात झाले आहे.याला उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे कोणत्या स्टाईलने देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.