पळसदेव, (प्रतिनिधी) – बारामती येथे कौशल्य, रोजगार व उद्योजकता नावीन्यता विभागाच्या वतीने बारामती येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो महारोगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आगमन होण्यापूर्वीच भरणे कार्यक्रम ठिकाणी दाखल झाले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भरणे यांनी येथे असलेल्या अनेक कंपनीच्या स्टॉलला भेट देऊन येथे उपस्थित एच. आर. व कंपनी व्यवस्थापकांना आजच्या मेळाव्यात इंदापूरमधील तरुण तरुणींना नोकरीसाठी प्राधान्य द्या, अशी विनंती केली असल्याचं पाहावयास मिळालं. त्यामुळे या मेळाव्याच्या निमित्ताने भरणे यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेवर असलेलं प्रेम पुन्हा पाहावयास मिळाले.
कौशल्य ,रोजगार व उद्योजकता नावीन्यता विभागाच्या वतीने बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालय येथे २ व ३ मार्च या दरम्यान नमो महारोगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री शरद पवार उपस्थित होते.
या वेळी आमदार भरणे यांनी कार्यक्रमाच्या अगोदर येऊन अनेक कंपनीच्या स्टॉलला भेट दिली. येथील उपस्थित एच. आर. व कंपनी व्यवस्थापकांशी संवाद साधला व इंदापूर तालुक्यातील युवकांना नोकरीमध्ये प्राधान्य त्यांना आजच नियुक्तीपत्र द्या, अशी विनंती ही या वेळी भरणे यांनी केली.
या वेळी भरणे यांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित अनेक युवकांशी संवाद साधला व त्यांच्या नोकरीविषयी असलेल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी अनेकांनी आमदार भरणे यांच्या सोबत फोटो व सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.