इंदापूर: सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावातून, स्वतःला बचावण्यासाठी आपली स्वच्छता ही सर्वतोपरी आवश्यक बाब आहे, यातही हातांच्या स्वछतेसाठी सॅनिटायझरचा वापर सर्वत्र होत असून, याला बरीच मागणीदेखील आहे.
नागरिकांकडून स्वतःच्या स्वछतेसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असणाऱ्या या सॅनिटायझरचा तुटवडाही निर्माण झाल्याचे आपण वेळोवेळी विविध माध्यमातून पाहत आहोत. या पार्श्वभूमीवर सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने इंदापूर तालुक्यातील नागरिकांनासाठी ५०० लिटर सॅनिटायझरचे मोफत वाटप होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने कार्य करणाऱ्या आरोग्य संस्था यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना हे सॅनिटायझर पोहचवले जाणार असल्याची माहिती प्रविण माने यांनी दिली
सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून, वेळोवेळी सामाजिक हिताचे कार्यक्रम पार पडत असतात. कोरोनाशी मुकाबला करताना, राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याची दखल घेत प्रतिष्ठान माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले असून यातून तब्बल २२७ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.
याचशिवाय सध्या इंदापूर तालुक्यातील गावांतून निर्जंतुकीकरण रसायन फवारणी एक दिवस आड सुरू केली असून, या फवारणीसाठी आवश्यक असणारे, निर्जंतुकीकरण रसायन सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत देण्यात येत आहे.
तसेच अजूनही कुणाला हे फवारणी रसायन मिळवायचे असल्यास ८१८००००००२ या नंबरवर संपर्क साधून आपण हे मिळवू शकता, असे आव्हान आपल्या माध्यमातून प्रविण माने यांनी केले आहे, या पश्चात नागरिकांना सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या अडचणी संदर्भात आणखीही मदत करणार असल्याचे माने यांनी सांगितले.