पुणे – मागील शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा थकीत ‘आरटीई’ चा निधी देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय द्यावा अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षापासुन ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्रातील शेकडो इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनांनी नागपूर विधानभवनावरील एक दिवसीय धरणे आंदोलनातुन दिला आहे. महाराष्ट्रातील हजारो गरीब व वंचित मुलांचे गुणवत्ता पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण थांबणार आहे त्यामुळे शासनाने हा निधी लवकर इंग्रजी माध्यमांच्या शाळांना द्यावा, असा आग्रह इंग्रजी माध्यम शाळा चालक संघटना ‘मेस्टा’ चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय तायडे पाटील यांनी घोषित केले.
महाराष्ट्रातून हजारो शाळा संस्थाचालक आणि शिक्षकांनी नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते. मागील चार वर्षाची ‘आरटीई’ शुल्क प्रतिकृती त्वरित देणे, करोना काळात कमी केलेला ‘आरटीई”चा निधी पूर्ववत करणे, अनावश्यक ऑनलाईन कामातून इंग्रजी शाळांना मुक्त करणे, दरवर्षीचा ‘आरटीई’ चा निधी मार्च च्या आधी शाळेच्या खात्यावर जमा करणे, अनाधिकृत शाळांवर कायमची बंदी घालण्यात यावी, इंग्रजी शाळांना शालेय पोषण आहार व शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू करणे, इंग्रजी शाळांच्या विकासासाठी आमदार आणि खासदारांचा निधी शाळांना प्रदान करणे या आणि इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय तायडे, प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.नामदेव दळवी, कार्यकारी सचिव खेमराज कोंडे, नागपूर विभागाध्यक्ष डॉ.मोहन राईकवार, नागपुर विभाग सचिव कपिल उमाळे, अनिल मोगरे, नरेश भोयर, मोहम्मद अरविंद, नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजाभाऊ टाकसाळे, वंदना बेंजामिन,अतुल रुईकर, सुदर्शन शिंदे, महेश कुंटूरकर आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.