नगर – प्रभाग सात मधील गणेश चौक, बोल्हेगाव फाटा परिसरामध्ये नुकताच करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यासाठी मनपाने संबंधित परिसरात सॅनिटायझरची फवारणी करून परिसर निरजंतुक करावे. तसेच आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अमोल लगड, हेमलता कांबळे, श्रृतिका दरेकर, कांचन इगोले, ओंकार ढवळे, भाऊ बारस्कर आदी उपस्थित होते. प्रभाग सात मधील नागापूर गावठान सौरभ अक्षय रो-हाऊसिंग व इतर रस्त्याची कामे तातडीने करण्यात यावी. कारण अनेक दिवसापासून या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची कामे लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच बोल्हेगाव परिसरात फवारणी करण्यासाठी सॅनिटायझरची कमतरता असल्यास मी माझ्या स्वखर्चाने सॅनिटायझर उपलब्ध करून देत असून, मनपाने लवकरात लवकर फवारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.