Porsche car accident case । पोर्श कार अपघात प्रकरणात मुलाची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर वडील विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि गाडीचा चालक गंगाधाम यांना गुन्हे शाखेत बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडून घटनाक्रमाची माहिती घेण्यात आली. त्यांनी दिलेली माहिती आणि अपघाताची घटना यांचा ताळमेळ घालण्यात येत आहे.तो ज्या बारमध्ये दारू पित होता त्या बारच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलीस अल्पवयीन आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले आहे. अशात आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी चर्चेत आलेले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यासंदर्भात स्पष्ट भूमिका अमितेश कुमार यांनी मांडली. त्या दिवशी पोलीस ठाण्यात आमदार सुनील टिंगरे आले होते, हे सत्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमितेश कुमार म्हणाले,’आमदार पोलीस ठाण्यात आले होते. ही बाब सत्य आहे. ते पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. पण अपघातानंतर पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कायदेशीर आणि नियमानेच झाली आहे. ही कारवाई करताना पोलिसांवर कोणाचा दबाब नव्हता. तसेच पोलीस ठाण्यात आरोपींना पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याच्या आरोपात तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तत्पूर्वी, प्रकरणी स्वतः सुनील टिंगरे यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. रात्री तीन वाजून 21 मिनिटांनी माझ्या पी एचा मला फोन आला की मोठा अपघात झाला आहे.
त्यानंतर अनेक कार्यकर्ते असल्याचा आणि विशाल अगरवालव यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली आहे. मी पोलिस स्टेशनला पोहचलो. त्यानंतर पोलीसांनी मला माहिती दिली. त्यानंतर मी पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करायला सांगितलं. मृतांच्या नातेवाईकांशी देखील मी बोललो.
मी पब आणि बारच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतलीय. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्या आधी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मी मदत केली. पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करण्याची मागणी देखील केली आहे.’ असं सुनील टिंगरे यावेळी म्हणाले.