IPL 2024 ( RR vs SRH Qualifier2, Weather Forecast) : क्वालिफायर-2 सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल जिथे त्यांचा रविवारी कोलकाता नाईट रायडर्सशी (केकेआर) सामना होईल. आयपीएल 2024 आता समारोपाकडे वाटचाल करत आहे आणि आता चालू हंगामात फक्त दोन सामने शिल्लक आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने चमकदार कामगिरी केली आणि हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसरीकडे, आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा चार विकेट्स राखून पराभव केला. त्यामुळे आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडले. हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे क्वालिफायर-1 सामना गमावूनही त्याचा प्रवास संपला नाही. राजस्थानने अंतिम फेरी गाठण्याचा पहिला अडथळा पार केला , मात्र गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिल्याने त्यांना आता क्वालिफायर-2 मध्ये हैदराबादचा सामना करावा लागणार आहे.
सामन्यादरम्यान पाऊस होईल का?
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील हा सामना चेन्नईमध्ये होणार असून आज तमिळनाडूसह दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, चेन्नईतील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. चालू आयपीएल मोसमात पावसामुळे तीन सामने पूर्णपणे वाहून गेले असले तरी या महत्त्वाच्या सामन्यासाठी हवामान खात्याचा अंदाज हा चाहत्यांसाठी दिलासा देणारा आहे.
सामना न झाल्यास कोणाला होणार फायदा ?
क्वालिफायर-2 सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी असली तरी या सामन्यात पाऊस पडला तरी काळजी करण्याची गरज नाही कारण या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी सामना होऊ शकला नाही तर शनिवारी सामना खेळवला जाईल. तथापि, दोन्हीही दिवशी पावसामुळे सामना होऊ न शकल्यास, हैदराबाद संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल कारण गुणतालिकेत सनरायझर्स हे दुसऱ्या तर राजस्थान तिसऱ्या क्रमाकांवर आहे.