सिंहगड रोड – खडकवासला विधानसभा मतदार- संघातील विविध समस्या तसेच त्यावरील उपाय- योजनांसाठी काय नियोजन करता येईल, यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मुंबई येथील भेटीत सविस्तर चर्चा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष (ग्रामीण) त्र्यंबक मोकाशी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मतदारसंघातील अपूर्ण रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन तसेच लॉकडाऊन कालावधीतील शालेय मुलांच्या अडचणी, बाजारपेठा आणि दैनंदिन कामकाज बंद असल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
मतदारसंघातील समस्येवर मार्ग काढण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना विनंती करण्यात आली. याबरोबरच खडकवासला मतदारसंघातील विविध विकास योजनांसाठी पुरेसा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणीही सुळे यांनी पवार यांच्याकडे केली आहे.