दिनेश कार्तिक, एक असा असामान्य क्रिकेटपटू की ज्याने त्याच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या कटू अनुभवांना मागे टाकत आजही कतृत्वाच्या शिखरावर स्थान मिळवले आहे. पहिल्या पत्नीने दगा दिला, तिने त्याच्याच मित्राशी लग्नही केले. त्याच्या वाईट काळात त्याचे जवळचे सवंगडीही त्याच्यापासून अंतर राखू लागले तरीही तो डगमगला नाही. आकाश फाटले तरीही त्याच्या छाताडावर पाय रोवून उभा राहीन हे लोकमान्यांचे वचन त्याने खरे करून दाखवले.
वयाच्या 36 व्या वर्षीही तो तरुणाईला लाजवेल अशी कामगिरी मैदानावर करत आहे. 2004 साली वयाच्या 19 व्या वर्षी त्याने भारतीय संघात पदार्पण केले. तब्बल 18 वर्षांची कारकीर्द घडवताना त्याने आपल्यातील गुणवत्ता अनेकदा सिद्ध केली. भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर महेंद्रसिंह धोनीचा उदय झाल्यावर या गुणी खेळाडूकडे अपरिमित दुर्लक्ष झाले. अर्थात त्याबाबत कोणालाही दोष देता येणार नाही कारण धोनीने इतके मोठे कतृत्व सिद्ध केले की, त्याची बरोबरी आजही कोणी करू शकणार नाही. पण ज्या मालिकांत तसेच ज्या सामन्यांत त्याला संधी मिळाली ती कार्तिकने वाया घालवली नाही.
2018 सालची निदहास स्पर्धा आपण सगळ्यांनी पाहिलीच असेल. त्याने ही स्पर्धा भारतीय संघाला जिंकून देताना आपल्या क्षमतेच्याही कितीतरी वरचढ कामगिरी केली. आज तब्बल 300 टी-20 सामने खेळणारा तो पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. तब्बल दोन दशकांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय भारतीय संघाने मिळवला, त्यातही त्याने आपला वाटा उचलला. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला होता. त्यानंतर मात्र त्याला संघातून वगळले गेले. तरीही त्याने हार मानली नाही व आयपीएलसह देशांतर्गत स्पर्धेत आपली कामगिरी सिद्ध करत राहिला.
कोलकाता नाईट रायडर्सकडून त्याचा आयपीएलचा प्रवास सुरू झाला व आता यंदाच्या मोसमात तो रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तेलगू कुटुंबात जन्मलेला कार्तिक आजही त्याच जोशात खेळत आहे. जर सातत्याने बेजबाबदार खेळी करूनही संघात ऋषभ पंतला कायम ठेवले जात असेल तर निवड समितीने कार्तिकलाही संघात पुनरागमनाची संधी द्यायला हवी. त्याची दुसरी पत्नी दीपिला पल्लीकल हीदेखील स्क्वॅशपटू आहे. तिने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केवळ सहा महिन्यांतच खेळाकडे पुनरागमन केले. इतकेच नव्हे तर तिने सौरव घोषालसह मिश्र दुहेरीत तर जोश्ना चिनाप्पासह महिला दुहेरीत यंदाच्या मोसमात जागतिक स्क्वॅश स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तिच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीच्या आड दिनेश कधीही आला नाही. आजही तो आयपीएल स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी करत आहे.
संकटांवरही जिद्दीने मात करणारा दिनेश पुन्हा भारताच्या संघात दिसला तर चाहत्यांनाही आनंदच वाटेल. 26 कसोटी, 94 एकदिवसीय व 32 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळत यशस्वी कारकीर्द घडवत कार्तिकने समीक्षकांनाही आपली दखल घ्यायला लावली आहे. भारतीय संघाच्या निवड समितीने आगामी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याचा विचार केला, तरच त्याची प्रामाणिक कारकीर्द सार्थकी लागली असे म्हणता येईल.