T20 World Cup 2024,Dinesh Karthik : – आयपीएल 2024 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने तो आगामी आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे भाष्य केले आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये १ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकापर्यंत कार्तिक ३९ वर्षांचा होईल. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वकरंडकाच्या संघाचाही कार्तिक एक भाग होता. त्यानंतर मात्र त्याने समालोचनकडे आपला मोर्चा वळविला होता. मात्र गेल्या दीड वर्षांत फिनिशर म्हणून त्याने मिळविलेली ओळख खऱ्याअर्थाने उल्लेखनिय असून त्यामुळेच त्याचे यंदाच्या विश्वकरंडक संघातील स्थान निश्चित मानले जात आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात, कार्तिकने आपल्या फलंदाजीला एका नवीन स्तरावर नेताना 205 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने शानदार फलंदाजी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये, विराट कोहली (361) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (232) नंतर 226 धावांसह तो संघाचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला, माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी मोठी भावना असेल. मी तसे करण्यास उत्सुक आहे. या टी-२० विश्वकरंडकात भारताचे प्रतिनिधित्व करण्याव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात यापेक्षा मोठे दुसरे काहीही नसेल.
भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी यंदा मोठी स्पर्धा आहे. कारण, यष्टीरक्षक म्हणून केवळ दोन खेळाडूंची संघात निवड होऊ शकते. त्यात ऋषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन आणि के.एल. राहुल हे खेळाडू या शर्यतीत आहेत.