दिलीप वळसे पाटील यांना भक्‍कम साथ द्या

स्वाती पाचुंदकर यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी

रांजणगाव गणपती – आगामी विधानसभा निवडणुकीकरिता सर्वसामान्य जनतेचे उर्वरित मूलभूत व महत्त्वपूर्ण प्रश्‍न सोडविण्यासाठी आणि विकासासाठी आपल्या हक्‍काचे लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना भक्‍कम साथ देत त्यांना मताधिक्‍य देऊन पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी केले.

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ स्वाती पाचुंदकर या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधत आहेत. जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांच्यासमवेत शिरूर महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा नलिनी खर्डे, कारेगावच्या माजी सरपंच वनिता कोहकडे, सदस्या मनिषा गवारे, रांजणगावच्या ग्रामपंचायत सदस्या अर्चना पाचुंदकर, आशा शेलार, बुरुंजवाडीच्या सरपंच पुनम टेमगिरे, पिंपरीच्या ग्रामपंचायत सदस्या कोमल डोळस, अर्चना खळदकर, सोनेसांगवीच्या माजी सरपंच अलका कदम, निमगावच्या सरपंच सुमन जाधव, उर्मिला फलके आदी महिला मान्यवर मतदारांशी संवाद साधत गाठीभेटी घेत आहेत.

स्वाती पाचुंदकर म्हणाल्या की, कोणताही राजकीय व सामाजिक वारसा नसतानादेखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामुळेच जिल्हा परिषदेत व जिल्हा नियोजन समितीत काम करण्याची संधी मिळाली. दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमांतून गेल्या 10 वर्षांत रांजणगाव जिल्हा परिषद गटातील रांजणगाव येथील 25 कोटी रुपयांची नळपाणीपुरवठा योजनासह विविध महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लावण्यात यश आले.

दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांमुळेच रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गट हा जिल्ह्यात विकासकामांच्या बाबतीत आदर्श गट म्हणून ओळखला जात आहे. या गटात वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून सुमारे 38 कोटी 76 लाख रुपये निधीतून महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागत असून, गटातील उर्वरित प्रश्‍न व कामे मार्गी लागण्यासाठी वळसे पाटील यांना ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी भरभक्‍कम साथ देणे आवश्‍यक आहे, असे पाचुंदकर यांनी
नमूद केले.

वळसे-पाटलांना मताधिक्‍य देणार
गेल्या विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच सोमवारी (दि. 21) होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातून मोठे मताधिक्‍य देण्याचा निर्धार आम्ही महिलांनी केला असल्याचे वनिता कोहकडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.