आ. शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल; शरद पवार, आ. पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत रॅली
कोरेगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी विराट शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांच्याकडे दाखल केला. यावेळी माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणमधील कॉंग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीनिवास पाटील, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार, आ. शिंदे यांच्या पत्नी सौ. वैशाली शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, ऍड. जयवंतराव केंजळे उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या विराट रॅलीत आघाडी व मित्रपक्षांचे पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.
आ. शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: शरद पवार कोरेगावात येणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून आलेले पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातून युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मार्केट यार्डापासून रॅलीला सुरुवात झाली. मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
शरद पवार, आ. पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, दीपक पवार, सौ. वैशाली शिंदे ऍड. विजयराव कणसे, ऍड. जयवंतराव केंजळे, अविनाश फाळके रॅलीच्या अग्रभागी होते. जळगाव नाका, आझाद चौक येथे राष्ट्रवादीच्या गाण्यावर कार्यकर्त्यांनी नृत्य केले. महाकाय क्रेनच्या साह्याने नेतेमंडळींना प्रचंड मोठा हार घालण्यात आला.
कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. आ. शिंदे यांना तर गुलालाने आंघोळच घालण्यात आली. आ. शिंदे, तेजस शिंदे व साहिल शिंदे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत जोरदार नृत्य केले. पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, विश्वजित घोडके, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.